"अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर"
या ओळी लहानपणी कोणा एका पुस्तकात वाचल्या होत्या. पण त्यावेळी या ओळींचा अर्थ नीट समजला नव्हता. पण आता या ओळींचा अर्थ पुरेपूर समजतोय. खरं तर याच ओळी नुसार सध्या आपण जगतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आयुष्याच्या संसाराची गाडी ही कदाचित कधी सरळ रस्त्यावर चालत नसते. ती नेहमी वळणावळणाच्या रस्त्यावरचं चालते. पण जर ती कधी सरळ रस्त्यावर चालली तर समजून जावं काही तरी गडबडतय.
.jpg)
लहानपणी नेहमी असं वाटायचं की आपण कधी मोठं होऊ? आई बाबांसारखे कधी कामाला जाऊ? पण आता मोठे झाल्योय, कमावत्या वयात आलोय तर आता असं वाटतंय की लहानपणचं सर्वात सुंदर होतं. उगाच मोठं झालो. हां... थोडं अभ्यासाचं ओझं होतं, पण आता सरत्या वयात जे ओझे डोक्यावर घेऊन माणूस जगतो त्यापुढे अभ्यासाचे ओझे बरे, असं वाटू लागलं. जबाबदाऱ्या आणि अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःचं आयुष्य जगायचं राहिलं की काय असा विचार नेहमी मनात येतो. दोन वेळेच्या अन्नासाठी आधी प्रवास करा , तो प्रवास करताना धक्के खा, मग ऑफिसला जाऊन बॉसच्या शिव्यांच्या स्तुती सुमनांनी दिवसाची सुरुवात करा, मन लावून काम करायचं तरी देखील काही तरी राहतंय असा विचार करत दिवस कसा बसा ढकलायचा. हेच काय ते आता रोजचं शेड्युल बनलंय. म्हणून ज्या सुरुवातीला ओळी लिहिल्या त्या अगदी आताच्या परिस्थितीत साजेश्या वाटतात. आयुष्याच्या संसाराची गाडी खेचण्यासाठी आधी हाताला चटके लावून घ्यायचे. मग महिन्याअखेरी त्याचा मोबदला आपल्या हातावर ठेवला जातो.

लहानपणी एका तहानलेल्या कावळ्याची गोष्ट शाळेत नेहमी ऐकवली जायची. एक कावळा असतो. त्याला खूप तहान लागते. तो पाण्याच्या शोधात सगळीकडे फिरत असतो. अचानक त्याला एक मडकं दिसत. तो त्या मडक्याकडे जातो आणि पाहतो तर त्या मडक्याच्या तळाला त्याला पाणी दिसत. त्याच्या लांब चोचीने तो त्या मडक्यातलं पाणी प्यायचा प्रयत्न करतो. पण त्याला ते पाणी पिता येतं नाही, मग बरीच मेहनत करून पण पाणी काय त्याला पिता येतं नाही. खूप वेळा नंतर विचार करून त्याला एक कल्पना सुचते. तर तो खाली पडलेले दगडाचे तुकडे त्या मडक्यात टाकतो. जसे जसे तो दगडाचे तुकडे मडक्यात टाकतो तसे तसे त्या मडक्यातील पाणी हळूहळू वर येतं. असं करत करत ते पाणी मडक्याच्या गळ्यापर्यंत येते आणि मग ते पाणी कावळा पितो आणि स्वतःची तहान भागवतो. या गोष्टीचं तात्पर्य एकचं की योग्य कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय आपल्या आयुष्याची तहान भागणार नाही. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. आयुष्याच्या शेवटापर्यंत "कष्ट" या शब्दाला काही पर्याय नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'आधी घासा आणि मग हसा' हा मंत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
पण एक गोष्ट तुमच्या कधी लक्षात आली का, ज्यावेळी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण दिवस रात्र एक करून कष्ट करतो आणि त्यानंतर काही काळाने ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हाचा तो आनंद काही वेगळाचं असतो. कदाचित तो आनंद आपण शब्दात व्यक्त ही करू शकतं नाही. त्यामळे आयुष्यात जर यशाच्या शिखरावर पोहचायचं असेल तर कष्ट करा.
स्वप्नांच्या आकाशात चमकला एक तारा। परिश्रमाच्या मातीवर वाढला त्याचा धारा।।
अडचणी येतील, थांबता येणार नाही। जिद्द आणि हिम्मत कधी सोडता येणार नाही।।
कुणा एका इंटरव्यू मध्ये एक संदर्भ ऐकला होता कि, 'वयाच्या ४ ० शी पर्यंत खूप पैसा कमवायचा, त्यासाठी खूप कष्ट करायचे आणि ४ ० शी नंतर राहिलेलं आयुष्य आपल्या फॅमिलीसोबत आरामात घालवायचं.' लॉजिकली हे पटलं हि आणि त्यानुसार जगणं सुरु हि केलं. पण कुठे तरी असं हि जाणवलं कि यशाच्या शिखरापर्यंत पोहचायला ज्या रस्त्यावर चाललो आहोत त्यात आयुष्य एन्जॉय करणं मात्र राहून गेलंय .
पण शेवटी हे आयुष्य आहे , ते असंच चालायचं....
ती एका गाण्याची ओळ आहे ना...
"जिंदगी गम का सागर भी हैं , हस के उस पार जाना पड़ेगा।"
अगदी असंच।
.
.
.
- फुलपाखरू
शब्द मांडणी उत्कृष्ट
ReplyDelete