तेल हि गेले, तूप हि गेले, हाती आले धुपाटणे - टोरेस कंपनीचा १ ३ हजार करोडचा घोटाळा !

हेरा फेरी हा हिंदी चित्रपट सर्वांना माहित असेलच. त्या चित्रपटात ‘लक्ष्मी चिट फंड’चा जसा फ्रॉड झालेला तसाच फ्रॉड मुंबईत देखील झाल्याचे दिसून येतेय. मुंबईत हेरा फेरी रिटर्न्स सारखी परिस्थिती उद्धभवली आहे. ‘टोरेस ज्वेलरी’ नामक कंपनी मुंबईतील लाखो गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन लंपास झालेय. "तेल हि गेले,तूप हि गेले, हाती आले धुपाटणे" हि म्हण आता टोरेस कंपनीत गुंतवणूक केलेल्या प्रत्येक गुंतवणूकदारावर पुरेपूर शोभून दिसतेय. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो मुंबईकरांना गंडा लावून टोरेस कंपनीचे मालक फरार झालेत.

६ जानेवारीला मुंबई आणि नवी मुंबईत असणारे टोरेस कंपनीचे सहा आउटलेट रातोरात बंद झाले. या कंपनीत लाखो नागरिकांनी कमी कालावधीत पैसे डबल होतील या हव्यासापोटी आपल्या कष्टाची कमाई काही विचार न करता गुंतवली आणि त्या लाखो नागरिकांची चिंता कंपनी अचानक बंद झाल्याने आता शिगेला पोहोचली आहे. जवळजवळ १३ हजार करोड चा घोटाळा करून हि कंपनी आता बंद झाली आहे.

टोरेस हि एक रशियन कंपनी आहे. २०२३ ला रजिस्टर्ड झालेली ‘प्लॅटिनम हरेन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने २०२४ मध्ये मुंबईच्या दादर मध्ये ३० हजार स्केअरफूट चे एक आउटलेट सुरू केले. त्यानंतर काहीच महिन्यामध्ये या कंपनीने दादर सोबत ग्रँट रोड, कांदिवली, मिरा रोड, नवी मुंबईत कल्याण आणि  सानपाडा या ठिकाणी देखील आउटलेट सुरू केले. ही कंपनी सोने, चांदी आणि लॅब निर्मित हिरे ज्यांना मोईसैनोइट स्टोन म्हटलं जातं ते विकत घ्यायला लावते. हि कंपनी ज्या रक्कमेत  गुंतवणूकदारांना सोने, चांदी आणि मोईसैनोइट स्टोन हे खरेदी खरेदी करायला सांगायची त्या रक्कमेवर ४८, ९६ आणि ५२०% प्रती वर्ष रिटर्न्स देण्याची खात्री द्यायची. प्रत्येक आठवड्यात गुंतवणूकदारांना त्यांचे रिटर्न्स दिले जात होते. कंपनी गुंतवणूकदारांना सोने, चांदी ऐवजी मोईसैनाईट स्टोन घेण्यासाठी प्रोत्साहित करायची कारण त्यावर एका आठवड्यात ८ ते ११% पर्यंत रिटर्न्स मिळत असे. या सर्व गोष्टींना भुलून नागरिकांनी डबल पैसे कमावण्याच्या हव्यासापायी त्यात लाखो रुपये गुंतवले. या कंपनीची स्वतःची अधिकृत वेबसाईट देखील इंटरनेटवर आहे आणि या कंपनीचे अधिकृत कार्यालय गिरगांवच्या ऑपेरा हाऊस मध्ये असल्याचे म्हटले जातंय. गुंतवणूकदार या कंपनीत ४००० रुपयांपासून गुंतवणूक करीत असत. जर तुम्ही रविवारी या कंपनीत पैसे गुंतवले तर पुढच्या आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार पर्यंत त्यांना त्यांचे रिटर्न्स मिळत असे. जर ६ लाख गुंतवले तर त्यावर ६% पर्यंत व्याज मिळत आणि ६ लाखाच्या वर गुंतवणूक केली तर ११% व्याज मिळत असे. सुरुवतीच्या काळात तर या कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी गाडी, मोबाईल, घर आणि सोन्याच्या दागिन्यांसारखे आकर्षित भेटवस्तू दिल्या आणि लोकांनीही डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी दिलेल्या अमिषाला भुलून त्यात अजून पैसे गुंतवले. पण मागील २ आठवड्यापासून पैसे न आल्यामुळे गुंतवणूकदार खूपच चिंतेत होते. त्यांनी या संदर्भात कंपनीला विचारले असता ८ जानेवारी पर्यंत पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. पण त्या आधीच या कंपनीचे लबाड लांडगे म्हणजेच कंपनीचे मालक लोकांचे गुंतवलेले सर्व पैसे घेऊन फरार झाले. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घोटाळ्यावर एपीएमसी पोलीस आणि सीबीआय कडून तपासणी सुरू आहे. तपासणी दरम्यान कंपनीशी जुळलेल्या पांच जणांवर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि तिघांना पोलिसांनी कस्टडीत देखील घेतले आहे आणि दोघांचा अजून हि तपास सुरू आहे.

टोरेस कंपनीचे दादरमधील आउटलेट हे मुख्य आउटलेट होते. त्याचसोबत मिरा रोडच्या रामदेव पार्क जवळ देखील त्यांचे आउटलेट होते. मोर आलेल्या माहितनुसार मीरारोड च्या नवघर पोलिसांनी युक्रेनच्या नागरिकांसह चार जणांवर गुन्हा दाखल करून कंपनीची बँक खात्यातील १ कोटी ७७ लाखांची रक्कम गोठवली आहे. दाखल गुन्ह्यात आतापर्यंत २८ जणांची ६८ लाखांची फसवणूक झाल्याचे नमूद आहे. मिरा भाईंदर वराई विरार पोलिसांनी या प्रकरणात सर्वात प्रथम पाऊले उचलत संबंधील लोकांचे अकाउंट फ्रीझ केले आहे.

टोरेस कंपनीचा हा घोटाळा होऊन ४ दिवस उलटले आहेत आणि दररोज या प्रकरणी संदर्भात नवनवीन अपडेट येत आहेत. नुकत्याच आलेल्या अपडेट नुसार टोरेसचा घोटाळ्याबाबत कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताने आठवड्यापूर्वीच पोलिसांसह तपास यंत्रणांना ईमेल पाठवून अलर्ट दिल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. एवढेच नाही तर नवी मुंबई पोलिसांना महिन्याभरापूर्वीच गुन्ह्यांची चाहूल लागून तपास ही सुरू केला होता. परंतु छापा टाकण्यापूर्वीच मुंबईत हा गोंधळ समोर आल्याने आरोपी हातातून निसटले. घोटाळा उघडकीस आल्यानंतर टोरेसचा इंस्टाग्राम आकाऊंटवरून सीए अभिषेक गुप्ता आणि सीईओ तौफिक रियाजचा फोटो शेअर करून यांनी कंपनीची लूट करत गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. सध्या हे अकाऊंट कोण हॅण्डल करत आहे याबाबत सायबर पोलीस तपास करत आहेत.
या संपूर्ण टोरेस कंपनीच्या घोटाळ्यानंतर प्रश्न हाच उरतो की ज्या लाखो नागरिकांनी पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार की नाही? आणि अशा मोठ्या घोटाळ्यानंतर आता तरी लोक सावध होऊन अशा घोटाळ्यांना बळी जाणं सोडणार का?


#torresscam #torres #torrescompanyscam #Torresdadar #torresmiraroad #torresnavimumbai #abhishekgupta #CBI #APMCpolice #Biggestscam #mumbai #herapheri #mumbaiscam #scam 

Comments